मुंबई : वृत्तसंस्था
देशात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांना कंबर कसली असून सर्व पक्षांचे कार्यक्रम, सभा, शिबीरे सुरु झाली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आता लोकसभेच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. राज ठाकरे आपल्या मिशन लोकसभानिमित्त उद्यापासून नाशिकच्या दौऱ्यावर जात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज घेणार नाशिकमधील मनसे पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन शिबिर घेणार आहेत.
नाशिकच्या दौऱ्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत विविध पक्षांचे अनेक स्थानिक पदाधिकारी मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत. लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या अन्य पक्षातील काही दमदार नेत्यांचेही प्रवेश होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. राज यांच्या उपस्थितीत नेमकं कोण मनसेत प्रवेश करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. उद्या १ फेब्रुवारीला राज ठाकरे नाशकात दाखल होणार आहेत. उद्याच राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन शिबिर आणि पक्षप्रवेश सोहळा आहे. त्यानंतर २ फेब्रुवारीला राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र राज ठाकरे यांचा नाशिक दौरा नेमका २ दिवसांचा असणार की ४ दिवसांचा याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.