ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनसे नेत्याने व्यक्त केला संताप : आता मराठी कलाकारांचे मौन का ?

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून मराठी-हिंदी भाषेवरून मोठे राजकारण तापले असतांना आता राज्यात पहिलीपासूनच अभ्यासक्रमात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाची चर्चा सुरु असतानाच आता हिंदीच्या सक्तीविरोधात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केले आहे. यातून संदीप देशपांडे यांनी मराठी कलाकारांकडून बाळगल्या जाणाऱ्या मौनावर संताप व्यक्त केला आहे.

प्राथमिक शिक्षणापासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे. अनेक संघटना आणि राजकीय पक्ष याला विरोध करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील काही लोकांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. मात्र, काही अपवाद वगळता मराठी कलाकारांकडून याबद्दल मौन बाळगले जात आहे. यावरून संदीप देशपांडे यांनी मराठी कलाकारांना चांगलेच सुनावले आहे. अनेक वेळा हिंदी चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांना चित्रपटगृहात स्क्रीन मिळत नाही. अशा वेळी मराठी कलाकार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटतात आणि मराठी चित्रपटांवर कसा अन्याय होतोय, याबद्दल बोलतात. याच मुद्द्यावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे हे मराठी कलाकारांवर संतापले.

“चित्रपटगृह मिळालं नाही की राजसाहेबांकडे येणारे मराठी कलाकार हिंदी सक्ती विरोधात का गप्प आहेत ? आपण कशाला राजकारणात पडा या कुपमंडूक वृत्तीतून बाहेर पडला नाहीत तर उद्योग ही मरेल आणि भाषा ही मरेल…,” असा इशारा संदीप देशपांडेंनी मराठी कलाकारांना दिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!