मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. मराठीसाठी आम्हीही आंदोलने केली आहेत. पण मनसेच्या आंदोलनाला आम्ही मराठीचे आंदोलन म्हणणार नाही, असे संजय राऊत म्हणालेत. आमच्या त्यांच्या राजकारणाला शुभेच्छा, असा टोलाही त्यांनी लगावला. मनसेचे आंदोलन हे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने चाललेले आहे, असा दावाही राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हणाले, आंदोलनाची राजकारणाची जी काही परंपरा आहे, त्यानुसार त्यांनी काम केले. आमच्या त्यांच्या राजकारणाला शुभेच्छा आहेत, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला. त्यांच राजकारण आहे, त्यांचा पक्ष आहे, त्यांचे कार्यकर्ते आहेत. पण ज्या प्रकारचे आंदोलन मराठीविषयी मी पाहत होतो, त्याला मी मराठीचे आंदोलन म्हणणार नाही.
बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा मराठी भाषेसाठी आंदोलने केलेली आहेत. मराठीसाठी आम्हीही लोकांच्या कानफडात मारलेल्या आहेत. बँकांमध्ये, सरकारी आस्थापणांमध्ये, एअर इंडियामध्ये राष्ट्रीय स्तरावर भरती होते, हे लक्षात घेतले पाहिजे. त्या भरती परीक्षेमध्ये मराठी मुलांना यश मिळण्यासाठी आम्ही क्लासेस चालू केले. अनेक तज्ज्ञ आणून शिवसेना भवनमध्ये क्लासेस चालवून मुलांची मानसिक तयारी केली. एवढी तयारी करून सुद्धा ती मुले नोकरीत आली नाहीत, काही गडबड दिसली, तर आम्ही आंदोलने केली. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे, हे मान्य केले पाहिजे. त्या स्पर्धेमध्ये आपल्या मुलांना पुढे न्यायचे असेल, तर त्यांची त्या पद्धतीने तयारी केली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
मारामाऱ्या आम्हीही खूप केल्या. यापुढेही करत राहू. पण मराठीच्या आंदोलनाला अशा प्रकारची एक दिशा द्यावी लागते, ती आम्ही दिली. म्हणून आम्ही हजारो मुले बँकेमध्ये नोकरीत लावली. मराठी भाषेचा आग्रह धरून आम्ही बँकांमध्ये, सरकारी आस्थापनांमध्ये मराठी भाषा करायला लावली. साहित्यिक, सांस्कृतिक, मराठी कार्यक्रम आजही बँकांमध्ये होतात, ते आमच्यामुळे होतात. आम्ही त्यासाठी कुणालाही कानफटात मारली नाही, असे संजय राऊत म्हणाले.