नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही वर्षापासून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे त्यात एक म्हणजे देशात सर्वात पहिल्यांदा मेट्रो सेवा सुरू करुन इतिहास रचणारे कोलकाता शहर आता एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. पाण्याखालून धावणारी देशातील पहिली मेट्रो आज कोलकाता शहरातून धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून ते कोलकाता येथील एका कार्यक्रमात अंडरवॉटर म्हणजेच पाण्याखालून धावणाऱ्या मेट्रोचे उद्घाटन करणार आहे. ही पाण्याखालील मेट्रो हुगळी नदीखाली बांधण्यात आली आहे. तब्बल 16.5 किमी लांबीचा मेट्रो मार्ग हुगळीच्या पश्चिम किनाऱ्यावरील हावडा आणि पूर्व किनाऱ्यावरील सॉल्ट लेक सिटीला जोडतो.
या मेट्रोचे विशिष्ट म्हणजे यात 10.8 किमी भाग भूमिगत आहे. हा भारतातील अशा प्रकारचा पहिला वाहतूक प्रकल्प आहे, ज्यामध्ये मेट्रो रेल्वे नदीखाली बांधलेल्या बोगद्यामधून जाणार आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील या मेट्रो रेल्वे सेवांचा आढावा घेतला घेत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली होती. दरम्यान, प्रवाशांसाठी पूर्णपणे तयार असलेली पाण्याखालील मेट्रो रेल्वे बुधवारी पंतप्रधान देशाला समर्पित करणार आहेत. याशिवाय पंतप्रधान मोदी कवी सुभाष-हेमंत मुखोपाध्याय मेट्रो सेक्शन आणि तरातळा-माजेरहाट मेट्रो सेक्शनचे उद्घाटन करणार आहेत.
यासोबतच पंतप्रधान मोदी देशभरातील अनेक मोठ्या मेट्रो आणि रॅपिड ट्रान्झिट प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवड मेट्रो-निगडी दरम्यान पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा 1 च्या विस्तारीकरणाची पायाभरणीही पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे.