ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोदींचे उफाळून आलेले प्रेम खोटं ; राऊतांची जोरदार टीका

मुंबई : वृत्तसंस्था

लोकसभेच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर असून ते ठाकरे गटासह महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडत असून त्यांच्या टीकेला देखील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत जोरदार प्रतिउत्तर देत आहेत. मोदींनी खिडकी काय दरवाजा उघडला तरी आम्हाला काही फरक पडणार नाही असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. मोदींचे उफाळून आलेले प्रेम खोटं आहे ते नकाश्रू आहेत अशी टीकाही त्यांनी केली. आज प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

यावेळी बोलतांना संजय राऊत म्हणाले, ”नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्रात आणि शिवसेनेत अडचणी निर्माण केल्या. मोदी यांचा बाळासाहेबांवर एवढं प्रेम असते तर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना अशा प्रकारे फोडली नसती. मनुसती तोडली नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नावं एका बेईमान माणसाला देण्याचे कृत्य केले नसते, त्यांचा धनुष्यबाण हे चिन्ह एका बेईमान व्यक्तीच्या हातावर ठेवले नसते”, अशी टीका राऊत यांनी केली.

पुढे राऊत म्हणाले, ”मोदींनी दरवाजे उघडले तरी काहीच फरक पडत नाहीत, आम्ही त्यासमोर उभं राहणार नाही. स्वाभिमान नावाची गोष्ट या महाराष्ट्रत अजून शिल्लक आहे. ते जर असे करत असतील तर याचा अर्थ एकच की मोदींना बहुमत मिळत नाहीये, त्यांचा पराभव होत आहे हे दिसंतय म्हणून ते अशा फटी, दरवाजे शोधत आहेत”, असा हल्ला राऊत यांनी चढवला.

यावेळी संजय राऊत यांनी सांगलीतील काँग्रेसच्या नेत्यांवर अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल केला. “महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना स्वत:ला जर वाघ म्हणून सिद्ध करायाचे असेल तर त्यांनी मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील त्यांना सगळ्यांनी मिळून विजयी केले पाहिजे. त्यानंतर 4 जूनला आम्ही येऊ आणि सगळ्या वाघांचा सत्कार करू. त्यावेळी आम्ही त्यांना सांगू की तुम्ही वाघ आहात. पण शिवसेना ही सर्टिफाइड वाघ आहे. आमचे बोधचिन्हच वाघ आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी चितारलेले आहे”, असे म्हणत संजय राऊत यांनी टीका केली.

तसेच ”वाघाच्या पोटात एक आणि ओठात एक कधीच नसतं. वाघ खुलेपणाने फिरतो आणि डरकाळी फोडतो. पण अलिकडच्या काळात मला सांगलीत बरेच वाघ दिसायला लागले असून त्या वाघांचे जतन करणे गरजेचे आहे. माझी सांगलीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा झाली आहे. माझी काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झालेली आहे. जेव्हा मी चर्चा करतो तेव्हा वेगळ्या पद्धतीने चर्चा करतो”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!