अकलूज : वृत्तसंस्था
माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ अकलूज येथील विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलात आयोजित जाहीर सभेत खा. पवार बोलत होते.
ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांवर दबाव आणायचा. त्यांना तुरुंगात टाकायचे. अशा पद्धतीची हुकूमशाही सध्या देशात सुरू आहे. मोदी गॅरंटीबद्दल नेहमीच बोलतात. परंतु या देशातील लोकशाही संपवणे हीच खरी मोदींची गॅरंटी आहे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.
खासदार शरद पवार म्हणाले, उजनी धरणाच्या उभारणीत शंकरराव मोहिते-पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. लोकांच्या हितासाठी त्यांनी साखर कारखाने, दूध संस्था काढल्या. पंतप्रधान हा देशाचा असतो, एका राज्याचा नसतो. महाराष्ट्रातील अनेक कंपन्या गुजरातला नेण्याचे काम मोदींनी केले. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणायचे. मुख्यमंत्री केजरीवाल, सोरेन यांना तुरुंगात टाकले. ही हुकूमशाही आहे. या देशातील लोकशाही टिकवण्यासाठी महाविकास आघाडीला आता जनतेने साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आ. जयंत पाटील म्हणाले, माढ्यातील निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीने भाजपला सळो की पळो करून सोडले आहे. कारखानदारांना धमक्या दिल्या जातात. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला जातोय. कारवाईच्या भीतीने नेते घरात आहेत, तर जनता रस्त्यावर उतरली आहे आणि हीच जनता यंदा महाराष्ट्रात परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही.
धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघातील सिंचनाचा प्रश्न सोडवायचा आहे. शेतकरी पाणीदार करायचा आहे. फलटण-पंढरपूर व रत्नागिरी-कराड-पंढरपूर रेल्वे मार्ग सुरू करायचा आहे. केळी संशोधन केंद्र सुरू करायचे आहे. नीरा उजवा कालव्याचे पूर्वीप्रमाणे नियोजन करायचे आहे. सोलापूर व सातारा जिल्ह्याच्या स्वाभिमानासाठी मी रात्रंदिवस झटेन. उत्तमराव जानकर म्हणाले, ७७ हजार कोटींच्या घोटाळ्यातील कावळ्याला चुना लावून बगळा करण्याचे काम भाजपने केले आहे. त्यांनी चंद्र, सूर्य सोडून सर्वकाही देण्याचे आश्वासन मला दिले, परंतु गेल्या दहा वर्षांत त्यांनी मला इतके फसवले की, माझा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही. म्हणून मी विमानातून उडी टाकून शरद पवार यांना भेटलो. आता माढ्याची खासदारकी पवार यांच्या पायावर घालूनच थांबेन. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, भूषणसिंह होळकर, युवक प्रदेश अध्यक्ष महिबूब शेख, माजी आमदार आर. जी. रुपनवर, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, जयसिंह मोहिते-पाटील, मदनसिंह मोहिते-पाटील, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, नीतेश कराळे, नगराध्यक्षा मीनलताई साठे, बाळासाहेब धाईंजे, संजय पाटील-घाटणेकर, साईनाथ अभंगराव, नामदेव वाघमारे यांच्यासह हजारो नागरिक या सभेस उपस्थित होते.