पुणे : वृत्तसंस्था
वारंवार गैरविश्वासाची भाषणे करण्याचे काम करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे ऐक्य धोक्यात आणले आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यांचे मतदान विरोधात गेल्याने पंतप्रधान मोदी अस्वस्थ झाले आहेत. तीन टप्प्यांतील मतदानानंतर मोदी अस्वस्थ झाले असल्याचा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला.
पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील, असे भाकित पवारांनी केले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी नंदुरबार येथील जाहीर सभेत मोदी यांनी पवारांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली. तसेच बारामतीच्या निवडणुकीनंतर पवार चिंतेत आहेत, असे नमूद केले होते. या ऑफरबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता पवार म्हणाले. आम्ही कायमच गांधी आणि नेहरूंची विचारधारा स्वीकारलेली आहे. देशाचे ऐक्य टिकवण्यासाठी सर्व घटकांना बरोबर घेऊन काम केले जाणार असताना मोदींची भाषणे ही एका समाजात गैरविश्वास निर्माण करणारी आहेत.
सध्या तरी मोदी हे मुस्लिमांबाबत वेगळा विचार मांडत आहेत. पंतप्रधान हे सर्वांचे असतात. त्यांनी देशाचे नेतृत्व करताना सर्वांना बरोबर घेऊन जाणे अपेक्षित असताना मोदी यांनी या पदाची प्रतिष्ठा कमी केली आहे. पंतप्रधानपदावर काम करताना त्यांनी काही पथ्ये पाळणे आवश्यक असते. मात्र त्यांनी अविश्वास निर्माण केल्याने आज संसदीय लोकशाही धोक्यात आली आहे.