ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चिंचोली औद्योगिक वसाहतीतून ३ बांगलादेशी अटकेत

मोहोळ  वृत्तसंस्था 

मोहोळ तालुक्यातील चिंचोली औद्योगिक वसाहती मध्ये वेगवेगळ्या कंपनीत काम करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकून अटक केली असून, त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

सोलापूर येथील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ कदम व त्यांचे सहकारी चिंचोली औद्योगिक वसाहती येथे येऊन थांबले होते. त्यावेळी मोहोळ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना फाळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी चिंचोली काटी व सावळेश्वर येथील पोलीस पाटलांना पाचारण केले, व शोध मोहीम राबवली त्यावेळी त्यांनी त्यांच्या राहत्या खोल्यांची तपासणी केली असता, त्या ठिकाणी चंचल विष्णु देव उर्फ विश्वनाथ रॉय उर्फ पहन (वय 29, रा. बेनिपुर, पोस्ट कटला, जिल्हा बिनासपूर, बांगलादेश) हा आढळून आला. पथकाने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने माझ्याकडे पासपोर्ट नसून सोलापूर येथील एका एजंटाकडून आधार कार्ड बनवून घेतल्याचे सांगितले. त्यांने दिलेल्या माहिती नुसार, रजा हुजूरअल्ली हुसेन (वय 38, रा. कटला) व त्याचा तिसरा साथीदार मीनल शनीचेरा (वय 30, रा. फुलयोनी, हमरस डंगा पाडा तहसील कटला जिल्हा बिनासपूर) हे आढळून आले. त्या तिघांकडून पंचा समक्ष आठ हजार पाचशे रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले.

या घटनेचा पंचनामा इ-साक्ष एप्लीकेशन मोबाईल द्वारे करण्यात आला. या तिघाकडे भारतामध्ये येण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे नाहीत, पासपोर्ट नाही, तसेच सीमेवरील मुलकी अधिकाऱ्याची परवानगी ही नाही असे चौकशीत आढळून आले. त्यामुळे या तिघा विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गोपाळ बजरंग साखरे यांनी फिर्याद दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या घटनेचा तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!