ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दोन दिवसांत मान्सून राज्यभर

मुंबई : वृत्तसंस्था

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) महाराष्ट्रातील उत्तरी सीमा असलेल्या जळगाव, नवसारी, अमरावती, चंद्रपूर आणि विजयनगरपर्यंतचा भाग व्यापला आहे. येत्या दोन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. तसेच महाराष्ट्रात पुढील चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. दक्षिण कोकण आणि गोव्याच्या काही भागांवर ढगांचा पट्टा पसरलेला आहे. या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापूरमध्येही ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात गुरुवारपासून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मान्सूनची वाटचालीमध्ये चांगली प्रगती आहे. मात्र मागील आठवड्यात असलेला पावसाचा जोर या आठवड्यात काहीसा कमी झाल्यामुळे राज्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार, तर अन्य बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडणार आहेत. त्यामुळे कोकण-गोव्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी मुसळधार, तर अन्य काही भागांत हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्याच्या विविध भागांत पाऊस पडणार आहे. राज्यात १४ जूनपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. परंतु या कालावधीत सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, पंढरपूर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील दक्षिणेकडील भागांमध्ये चांगला पाऊस पडणार आहे. उर्वरित राज्यात मात्र खूप मोठा पाऊस होणार नाही. तसेच १५ आणि १६ जूनदरम्यान पावसाची विश्रांती पाहायला मिळू शकते. दरवर्षीपेक्षा यंदा राज्यात लवकर चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. जून महिन्यात मान्सून जरी महाराष्ट्रात दाखल झाला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस राज्यात पडत नाही. सर्रास जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्यातच राज्यात चांगला पाऊस होत असतो. या वेळी मात्र जून महिन्याच्या सुरुवातीलाच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!