नवी दिल्ली : वृत्तसंस्था
डिसेंबर आणि जानेवारीमध्ये नेहमीपेक्षा जास्त कोरडेपणा अनुभवल्यानंतर देशात फेब्रुवारी महिन्यात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) बुधवारी व्यक्त केला. उत्तर भारत, ईशान्य आणि मध्य भारतात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाचे तर दक्षिण द्वीपकल्पीय भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
देशभरात फेब्रुवारी महिन्यात एकत्रितपणे सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे संचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली. उत्तर पश्चिम भारतात जानेवारी महिन्यात फक्त ३.१ मिमी पावसाची नोंद झाली होती. १९०१ सालापासून सर्वात कमी पावसाची दुसरी वेळ होती. पूर्ण फेब्रुवारी महिन्याचा विचार केल्यास देशात सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर देशाच्या बहुतांश भागात सामान्यपेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. मध्य भारतातील काही भागात फेब्रुवारी महिन्यात सामान्यपेक्षा कमी थंड वारे वाहण्याचा अंदाज आहे.