ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तब्बल दीडशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा

छ. संभाजीनगर : वृत्तसंस्था

पैठण तालुक्यातील केकत जळगाव जिल्हा परिषद शाळेतील सुमारे 181 हून अधिक विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आलीय. बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात तर काही विद्यार्थ्यांची प्रकृती नाजूक असून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले होते. हे बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पोट दुखू लागले. काही जणांना मळमळ, उलट्या होऊन सुमारे 293 विद्यार्थ्यांपैकी 181 विद्यार्थी तापाने फणफणल्याचा प्रकार लक्षात आल्यावर या सर्व विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. काहींना सलाइन लावण्यात आले आहेत. सर्व मुलांचे उपचार सुरु असून, या 10 मुलांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरू आहे.

विषबाधा झालेले सर्व विद्यार्थी सातवीच्या वर्गातील आहेत. या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा भाग म्हणून शनिवारी बिस्किटं देण्यात आली. ती खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या, तर काहींना चक्कर येऊ लागली. शालेय पोषण आहारात दिल्या जाणाऱ्या बिस्किटांची अन्न आणि औषध प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. वाटप करण्यात आलेल्या बिस्किटांची मुदत संपायला अजून दोन महिने बाकी होते. ती बिस्किटं आम्ही स्वतः खाल्ली आणि नंतर ती विद्यार्थ्यांना वाटली. विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक कशी बिघडली हे आम्हालाही कळलं नाही, अशी माहिती प्राचार्य भागवत शिंदे यांनी दिली. त्याचबरोबर शाळेत वाटण्यात आलेल्या बिस्किटांचा नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवू. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती शाळा समितीचे अध्यक्ष अशोक बढे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!