नवी दिल्ली वृत्तसंस्था : सध्या देशभरात गिग कामगारांच्या समस्या ऐरणीवर आल्या असून, योग्य मोबदला, आर्थिक-सामाजिक सुरक्षा आणि कामाच्या ताणामुळे निर्माण होणाऱ्या जीवितधोक्याबाबत तीव्र चर्चा सुरू आहे. ऑनलाईन फूड आणि क्विक-कॉमर्स डिलिव्हरी क्षेत्रातील कंपन्या कामगारांना हवे तेव्हा कामावरून काढून टाकतात, कमी वेळेत डिलिव्हरी करण्याचा ताण देतात, यामुळे अनेक अपघात घडत आहेत. अशा परिस्थितीत गिग कामगारांनी नुकतेच नववर्षाच्या पूर्वसंध्येला संपाचा मार्ग अवलंबला होता. या पार्श्वभूमीवर आता एका खासदाराने प्रत्यक्ष मैदानात उतरून या कामगारांचे प्रश्न समजून घेण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी चक्क डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली आहे. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, या व्हिडीओत ते क्विक-कॉमर्स कंपनी ब्लिंकइटचा युनिफॉर्म परिधान करून डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करताना दिसत आहेत. हेल्मेट, डिलिव्हरी बॅग आणि स्कूटीसह ते एका डिलिव्हरी बॉयसोबत पार्सल वाटपासाठी निघाल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळते.
सोमवारी स्वतः हा व्हिडीओ शेअर करत राघव चड्ढा यांनी लिहिले, “बोर्डरूमपासून दूर, थेट जमिनीवर. मी त्यांचा दिवस जगून पाहिला.” डिलिव्हरी पार्टनर्सना दररोज कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठीच आपण हा प्रयोग केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या अनोख्या पावलावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.
विशेष म्हणजे याआधीही राघव चड्ढा यांनी राज्यसभेत १० मिनिटांच्या डिलिव्हरी धोरणाविरोधात आवाज उठवला होता. घाईघाईत डिलिव्हरी करताना डिलिव्हरी पार्टनर्स अपघाताचे बळी ठरू शकतात आणि रस्त्यावर चालणाऱ्यांसाठीही धोका निर्माण होतो, असा इशाराही त्यांनी दिला होता. आता प्रत्यक्ष डिलिव्हरी बॉय बनून त्यांनी गिग कामगारांच्या प्रश्नांकडे देशाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.