ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तानवडे यांच्या पुढाकाराने जि.प कडून नागम्मा बजेला ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर

अक्कलकोट,दि.२८ : राज्यस्तरीय बांबु उडीत प्रथम क्रमांक पटकावलेल्या अक्कलकोट तालुक्यातील नागम्मा बजे हिला केवळ फायबर पोल नसल्याने आसाम येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता आले नाही.निदान भविष्यात तरी तिला या खेळात प्राविण्य प्राप्त करता यावे या हेतूने वागदरी गटाचे जि.प सदस्य आनंद तानवडे यांनी जि प महिला व बाल विकास अधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे फायबर पोल व शिष्यवृत्ती निधीसाठी मागणी केली होती. त्यानुसार जि प सोलापूर महिला बाल कल्याण विभागाच्याच्यावतीने ५० हजार रुपये शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे.

गेल्या १५ फेब्रुवारी रोजी वागदरी गटाचे जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी याबाबत महिला व बालकल्याण विभागामार्फत व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत राज्य शासनाच्या योजनेतून नागम्मा हिला शिष्यवृत्ती देण्याची शिफारस या विभागाकडे केली होती. या शिफारसीला महिला व बालकल्याण विभाग सभापती स्वाती शटगार यांच्या नेतृत्वाखाली ५० हजार रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.अक्कलकोट तालुक्यातील सदलापूर येथील नागम्मा बजे ही सध्या अक्कलकोट येथे अकरावीत शिकत आहे. हडपसर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बांबु उडीत नागम्माने प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय स्पर्धेत नैपुण्य दाखवण्यासाठी नागम्मा हिच्याकडे फायबर पोल नसल्याने तिला राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता आले नाही.

आसाम राज्यातील गुवाहाटी येथे पाच फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्तरावरील बांबुउडी ( पोल वोल्ट ) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत उडी मारण्यासाठी खेळाडूचे वजन उंचीच्या क्षमतेनुसार फायबर पोल आवश्यक असतो हा पोल केरळमध्ये मिळत असून याची किंमत सुमारे ७० हजार रुपये आहे. केवळ ७० हजार रुपयांच्या किमतीचा फायबर पोल उपलब्ध न झाल्याने ग्रामीण भागातून राज्यस्तरावर चमकणारी नागम्मा राष्ट्रीय स्तरावर चमकण्यापासून वंचित राहिली. निदान आगामी स्पर्धेत तरी तिला सहभागी होता यावे व तिला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी या हेतूने जि प सदस्य आनंद तानवडे यांनी नागम्मा हिला ५० हजाराची शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली आहे. यावेळी महिला बालकल्याण अधिकारी जावेद शेख, महिला बालकल्याण सभापती स्वाती शटगार, जि प सदस्य आनंद तानवडे, मंगल वाघमोडे, रत्नमाला पोतदार, रेखा राऊत, मंजुळा कोळेकर ,राणी कोळबले, रोहिणी ढवळे, संगीता डोईफोडे, लक्ष्मी आवटे आदी उपस्थित होते.

 

महाराष्ट्र चॅम्पियन खेळाडू आमच्या तालुक्याची भुषण आहे.तिला शिष्यवृत्ती मंजूर व्हावी यासंबंधी महिला बाल विकास सह क्रीडा अधिकाऱ्याकडे प्रस्तावही सादर केला होता.आमच्या प्रस्तावाचा विचार करून ५० हजार शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.नागम्मा ही नक्कीच आपल्या देशासाठी खेळेल आणि सुवर्णपदक मिळवेल- आनंद तानवडे, जि प सदस्य वागदरी

 

नागम्मा सारखे अनेक खेळाडू तयार व्हावेत. मुलगी होऊन कोणतेही न्यूनगंड न बाळगता बांबू उडी या खेळ प्रकारात त्यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुढील शिक्षणासाठी तिला अडचण येऊ नये म्हणून ही शिष्यवृत्ती मंजूर केली आहे- स्वाती शटगार,
सभापती,महिला बाल कल्याण विभाग

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!