नागनहळळीच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी घोडदौड
स्मार्ट ॲग्रीकल्चर प्रकल्पास जिल्ह्यात प्रथम क्रमांक
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : सोलापूर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन करणाऱ्या के. एस. एम. कनिष्ठ महाविद्यालय, नागनहळळी येथील विद्यार्थ्यांच्या स्मार्ट ॲग्रीकल्चर, कॅटल फार्म व बहुउपयोगी शेतीयंत्र या अभिनव प्रकल्पाची आता राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. या यशामुळे अक्कलकोट तालुक्याच्या शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रात गौरवाची भर पडली आहे.
राज्य विज्ञान संस्था, रवी नगर, नागपूर व शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी), गोपाळपूर, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात जिल्ह्यातील माध्यमिक गटातून एकूण ३९ वैज्ञानिक उपकरणांची मांडणी करण्यात आली होती. या स्पर्धात्मक प्रदर्शनात के. एस. एम. कनिष्ठ महाविद्यालय, नागनहळळी येथील विद्यार्थी महेश टेंगळे, हरळय्या यशवंत व ओंकार फडतरे यांनी सादर केलेल्या प्रकल्पाने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
या प्रकल्पामुळे शेती व्यवस्थापन अधिक सुलभ, आधुनिक व कार्यक्षम होते. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हवामानाचे निरीक्षण करता येते. पाणीपुरवठा व सिंचन प्रणालीवर अचूक नियंत्रण मिळाल्यामुळे पाण्याची बचत होते. पशुपालनासाठी लागणारा वेळ, श्रम व खर्च कमी होतो, तर गोठ्यामध्ये स्वयंचलित व्यवस्थापन प्रणाली उपलब्ध होते. संपूर्ण प्रणाली सौरऊर्जेवर आधारित असल्यामुळे वीज खर्चात बचत होऊन पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळते.
बहुउपयोगी शेतीयंत्राद्वारे पीक व फळबागांवर औषध फवारणी, तण नियंत्रण तसेच पेरणी करता येते. हे सर्व कार्य मोबाईलद्वारे नियंत्रित करता येते. त्यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांना आधुनिक, स्वयंपूर्ण व किफायतशीर शेती करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे.
जिल्हास्तरीय प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर लातूर येथे झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शक विज्ञान शिक्षक रवींद्र नवले, अमोल पाटील, वसीम शेख, शंभुलिंग बशेट्टी व नुरुद्दीन शेख यांचा गौरव इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्याचे सचिव अप्पासाहेब धुळाज यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेचे सचिव जावेद पटेल, प्राचार्य आय. एम. मुजावर यांच्यासह शिक्षकवृंदाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.
सचिवांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव
सोलापूर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आश्रमशाळा नागनाळळी यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान लातूर येथे पार पडला. हा सन्मान इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्याचे सचिव अप्पासाहेब धुळाज यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या राज्यस्तरीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.