रांची : झारखंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. राजधानीतील हरमू मैदान येथे हा मेळावा घेण्यात आला. संघटना बळकट करण्यासाठी झारखंडमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित झाले होते.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला तर दुसरीकडे माजी कर्णाधार महेंद्रसिंग धोनीवर स्तुतीसुमने उधळली. भारतीय क्रिकेट संघाला मोठ्या उंचीवर नेण्याचं श्रेय धोनीचं आहे. राहुल द्रविड हा कर्णधारपद सोडण्यासाठी आला असताना आपण सचिन तेंडुलकरला कर्णधारपद घेण्यास सांगितले मात्र सचिन तेंडुलकरने कर्णधारपद नाकारुन धोनीचं नाव सुचवलं. धोनीच्या भूमीत आल्याचा आपल्याला अभिमान आहे, असे शरद पवार म्हणाले.

केंद्रातील भाजप सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका करताना पवार म्हणाले, भाजपच्या हाती सत्ता गेल्याने देशात जातीयवादाचे विष वाढत आहे, असा आरोप शरद पवारांनी यावेळी केला. दिल्लीत मागील १०० दिवसांपासुन शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान मोदींना विदेश दौऱ्यांसाठी वेळ आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी वेळ आहे. पण २० किमी अंतरावर असलेल्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी मोदींना वेळ नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली.