मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानंतर आता राष्ट्रवादी देखील अजित पवार यांच्याकडे आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी जाहीर केला. १० जानेवारी रोजी शिवसेनेसंदर्भात निर्णय देताना ज्या ३ मुद्द्यांचा आधार घेतला त्याच अाधारावर नार्वेकरांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील एकही आमदार अपात्र नसल्याचा निर्वाळा दिला. विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच असल्याचा निष्कर्ष अध्यक्षांनी काढला.
२ जुलै रोजी अजित पवारांनी ४० आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सहभाग घेतला होता. मात्र या निर्णयाला शरद पवारांचा विरोध होता. दोन्ही गटांनी पक्ष आमचाच असल्याचा दावा करून परस्परांविरोधात अपात्रतेच्या ५ याचिका दाखल केल्या होत्या. शिवसेनेतील सत्तासंघर्षाचा ११ मे रोजी निकाल देताना सुप्रीम कोर्टाने पक्ष घटना, नेतृत्व-नेतेपदाची रचना व बहुमत या तीन ३ मुद्द्यांच्या आधारे पक्ष कुणाचा हे ठरवण्याचे निर्देश अध्यक्षांना दिले होते. त्यानुसारच निर्णय घेतल्याचे अॅड. राहुल नार्वेकरांनी सांगितले.
पक्षात रीतसर निवडणूक घेऊन शरद पवार यांची अध्यक्षपदी निवड झालेली होती तरीही अध्यक्षांनी ते अवैध ठरवली. हे चुकीचे आहे. या निकालाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
पक्षातील अंतर्गत वादावर पक्षांतरबंदी कायद्याने कारवाई करता येत नाही. पक्षातील बहुमताला १० व्या अनुसूचीने धमकावताही येत नाही. संबंधितांना पक्ष निलंबित करू शकतो, पण विधिमंडळ सदस्यत्वाशी त्याचा संबंध नसतो. -राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष