मुंबई : वृत्तसंस्था
निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या आधारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा मुद्दा निकालात काढल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीविषयी ते कोणता निकाल देतात, याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह यावर शरद पवार-अजित पवार गटांनी केलेल्या दाव्यांविषयी भारतीय निवडणूक आयोगाने राखून ठेवलेला निकाल कधीही लागू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या वर्षी २ जुलै रोजी फूट पडल्यानंतर खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची यावर निवडणूक आयोगापुढे ६ ऑक्टोबरपासून ८ डिसेंबरपर्यंत तीन महिने सुनावणी चालली. दोन्ही गटांकडून लाखो प्रतिज्ञापत्रे आणि दस्तावेज सादर केले. ८ डिसेंबर रोजी याप्रकरणी सुनावणी संपवून आयोगाने निकाल राखून ठेवला आहे. दोन्ही गटांच्या दाव्यांची पडताळणी केल्यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची, यावर निवडणूक आयोगाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे; परंतु याच महिन्यात आयोगाचा निकाल आल्यास तो राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर ३१ जानेवारीला द्यावयाच्या निकालाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.