ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राष्ट्रवादी नेहमीच आग्रही : अजित पवार

मुंबई : वृत्तसंस्था

विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिला चांगल्या पद्धतीने काम पाहत असून जिजाऊ आणि सावित्रीबाईंचा वारसा त्या सक्षमपणे चालवत आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात असून चौथे महिला धोरणही आणले जात आहे. समाजातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच आग्रही आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

गुरुवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला संघटनेच्या वतीने षण्मुखानंद सभागृहात आयोजित ‘निर्धार नारी शक्तीचा’ या मेळाव्यात पवार बोलत होते. मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धर्मरावबाबा आत्राम, नरहरी झिरवाळ, मंत्री अनिल पाटील, आदिती तटकरे, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, आदींसह इतर पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी पवार पुढे म्हणाले, राज्यातील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे राज्याचे महिला धोरण सादर करत असताना कोणत्याही त्रुटी त्यामध्ये म राहता कामा नयेत याची दक्षता आदिती तटकरे यांनी घेतली आहे.

महिला सुरक्षा, महिला आरक्षण या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच महिलांच्या बाजूने उभी राहिली आहे. राज्यात मोठे प्रकल्प येऊन राज्याचा विकास व्हावा यासाठी आपण सत्तेत सहभागी झालो आहोत. आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मागणाऱ्या घटकांना आरक्षण दिले जावे, अशी पक्षाची भूमिका असल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!