ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुधारणा व ग्रामीण भागात अमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज: सीईओ स्वामी

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सीईओ स्वामी यांनी ग्रामपंचायत विभागाचा आढावा घेतला. यावेळी ग्रामपंचायत विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन सीईओ स्वामी यांनी कर्मचारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून आवश्यक अशा सूचना दिल्या.

क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके, सेवानिवृत्ती प्रकरणे तात्काळ निकाली काढावे. शिस्तभंग विषयक कारवाईची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असून त्यावर आवश्यक ती कार्यवाही करून सर्व प्रकरणांचा निपटारा लवकर करण्यात यावा.जिल्हा परिषदेच्या प्रत्येक मालमत्तांची नोंदी घेण्याचे कामकाज करण्यासाठी यापूर्वी स्वतंत्र नोंदी ठेवलेल्या होत्या त्यांचे अवलोकन करून सर्व प्रॉपर्टी चे उतारे अद्यावत करून घेणे गरजेचे आहे.

दोन वर्षापासून हे काम प्रलंबित आहे. सर्व मालमत्तांचे उतारे अद्यावत करून घ्या. अंत्योदय योजनेचा संपूर्ण निधी वेळेत खर्ची घाला कोणत्याही परिस्थितीत निधी परत जाणार नाही याची दक्षता घ्या. ग्रामपंचायत विभागाचे ग्रामपंचायतींवर नियंत्रण हवे या विभागाचा प्रशासकीय धाक ग्रामपंचायतीवर असावयास हवा. राळेगण सिद्धी, हिवरे बाजार व पाटोदा या गावांप्रमाणे आपल्या जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये सुधारणा व्हायला हवेत.

आदर्श ग्राम यांची संख्या जिल्ह्यामध्ये वाढली पाहिजे त्यादृष्टीने या विभागाने ग्रामपंचायतींना कामाला लावले पाहिजे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेला विभाग म्हणून मला तुमच्याकडून या कामांची अपेक्षा आहे. तुमच्या कामकाजाविषयीच्या तक्रारी कमी होऊन लोकांनी तुमच्याविषयी चांगले बोलले पाहिजे असे माझे मत आहे.

पंचायत समिती स्तरावरील विस्ताराधिकारी, कनिष्ठ प्रशासनाधिकारी अधिकारी यांच्या बैठका घ्या व सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर निकाली काढा. अशा सूचना स्वामी यांनी बैठकीत दिल्या.

ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा केला जातो अशा ज्या योजना आहेत तिथे ग्रामपंचायतीने वेळच्यावेळी पाणीपट्टी भरणे गरजेचे आहे. त्याचा उपकर आपणास मिळतो व जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात भर पडते त्यामुळे ग्रामपंचायतीने वेळेवर पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे असे मत यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार यांनी व्यक्त केले.

यावेळी बैठकीत मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय सिंह पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे व ग्रामपंचायत विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!