अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी अक्कलकोट नगरपरिषदेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवून प्रभाग क्रमांक चारमधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत नगरसेवकपद पटकावले. त्यांच्या या यशानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मडीखांबे यांना मुंबई येथे बोलावून घेतले व निवडीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान आठवले यांनी अक्कलकोट नगरपरिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महायुतीतील घटक पक्ष म्हणून रिपाइंला अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी महायुतीचा धर्म पाळत तीन जागा सोडल्या होत्या. त्यापैकी दुधनी येथे आम्रपाली सैदप्पा झळकी व मैंदर्गी येथे विजयकुमार पोतेनवरु यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला, तर अक्कलकोट नगरपरिषदेत तालुकाध्यक्ष मडीखांबे हे अधिकच्या मताधिक्याने विजयी झाले.
या तिन्ही नगरपरिषदांच्या निवडणूक निकालांबाबत आठवले यांनी सविस्तर चर्चा केली. तसेच अक्कलकोट व दुधनी नगरपालिकांमध्ये बहुमत मिळविल्याबद्दल आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.रिपाइं आणि मी सदैव तुमच्या सोबत आहोत,असे आश्वासनही त्यांनी दिले.
याप्रसंगी आठवले यांनी मिठाई भरवून अविनाश मडीखांबे यांच्या विजयाचा आनंद साजरा केला. तसेच त्यांच्या भावी राजकीय वाटचालीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या भेटीवेळी ज्येष्ठ नेते अविनाश महातेकर, प्रवीण मोरे, हेमंत रणपिसे, महेश लंकेश्वर, अतिश पुटगे, विकास गायकवाड, उत्तम केतन आदी मान्यवर उपस्थित होते.