ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्राला नवे राज्यपाल : जिष्णू देव वर्मा यांच्यावर राष्ट्रपतींची मोहोर

मुंबई : वृत्तसंस्था

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी तेलंगणाचे राज्यपाल असलेल्या जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती जाहीर केली आहे. त्याचबरोबर तेलंगणाच्या राज्यपालपदी सध्या हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असलेले शिव प्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनातून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती ही राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखले जाणारे जिष्णू देव वर्मा हे त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित आहेत आणि भाजप मधील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे. 2018 ते 2023 या कालावधीत त्यांनी त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत वित्त, ऊर्जा, नियोजन, पंचायत राज आणि ग्रामीण विकास यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती.

जिष्णू देव वर्मा यांचा जन्म 15 ऑगस्ट 1957 रोजी अगरतळा येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. 1990 च्या दशकात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सक्रिय राजकारणाची सुरुवात केली. त्या काळात त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांचे वर्चस्व असतानाही भाजपची संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले.

2018 मध्ये त्रिपुरात भाजप सत्तेत आल्यानंतर जिष्णू देव वर्मा यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. या काळात त्यांनी राज्याच्या आर्थिक नियोजनावर विशेष भर दिला. ग्रामीण पायाभूत सुविधा, ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा आणि केंद्र सरकारच्या विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे त्रिपुराच्या विकास प्रक्रियेत त्यांच्या नेतृत्वाची विशेष नोंद घेतली जाते. राजकारणातील दीर्घ अनुभव आणि प्रशासकीय कामकाजातील पकड लक्षात घेऊन त्यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. आधी त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आणि आता त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. राजकारणाबरोबरच जिष्णू देव वर्मा यांना साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्राचीही आवड आहे. ते कवी आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात. तसेच बॅडमिंटन खेळाशी त्यांचा विशेष संबंध असून विविध क्रीडा संघटनांमध्येही त्यांनी नेतृत्वाची भूमिका बजावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!