सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसुतीनंतर अवघ्या पाच दिवसाच्या नवजात मुलीला आईने अचानक सोडून गेले, अशी धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीवर सध्या रुग्णालयातील स्टाफ उपचार करत असून तिच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत आहे. अक्कलकोटच्या शांती चौक येथील पाण्याच्या टाकीखाली राहून भीक मागून जगणारी छाया नागेश राऊळे ही महिला आठ महिन्यांची गरोदर होती. मंगळवार (दि. १७) रोजी तिला अचानक पोटात दुखू लागले, त्यामुळे नातेवाईकांनी तिला सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास तिने सिझर प्रसुती करून मुलगी जन्माला आणली.
सिझर प्रसुतीनंतर छाया राऊळे अचानक रुग्णालयातून पलायन झाली. जन्मलेली मुलगी रडत नव्हती, त्यामुळे उपस्थित नातेवाईकांनी तिला नवजात शिशुच्या अतिदक्षता (एलआयसीयू) विभागात दाखल केले. सध्या या नवजात मुलीवर कोणीही नातेवाईक नाहीत आणि रुग्णालयाचे स्टाफ तिची काळजी घेत आहे. शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी मुलीच्या अन्न, तापमान, औषधोपचार आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत आहेत. मुलीवर नियमित वैद्यकीय तपासणी सुरू असून तिच्या आरोग्य स्थितीला पूर्ण लक्ष ठेवले जात आहे.
ही घटना सामाजिक दृष्ट्या चिंताजनक असून, बालकाच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आणि आरोग्य विभाग यांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. रुग्णालयाचे अधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक प्रशासनाने नवजात मुलीवर पुढील काळजीसाठी विशेष लक्ष ठेवण्याचे सांगितले आहे.