---Advertisement---

विनापरवानगी पुतळा, २३ जण अटकेत; गावात तणावपूर्ण शांतता

By team
On: February 23, 2026 3:26 PM
Follow Us:
---Advertisement---

बुलढाणा :  वृत्तसंस्था

बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनधिकृत पुतळा स्थापनेवरून निर्माण झालेला वाद गंभीर वळणावर पोहोचला आहे. गेल्या चार दिवसांपासून गावात तणावपूर्ण वातावरण असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाने कलम १६३ अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गावचे सरपंच गणेश काकड यांच्यासह एकूण २३ जणांना अटक केली असून चाळीसपेक्षा अधिक जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी चिखला काकड येथील अंगणवाडी परिसरात विनापरवानगी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. त्या वेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित असल्याचे सांगितले जाते. मात्र पुतळा स्थापनेसाठी कोणतीही शासकीय परवानगी घेण्यात आलेली नव्हती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बीबी पोलिसांनी ५ फेब्रुवारी रोजी महसूल विभागाला अहवाल सादर करून पुतळा हटवण्याची शिफारस केली. त्यानंतर महसूल प्रशासनाने चौकशी करून ११ फेब्रुवारी रोजी लोणार तहसील कार्यालयामार्फत ग्रामपंचायतीला पुतळा हटवण्याचे निर्देश दिले. विनापरवानगी उभारलेला पुतळा कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

पुतळा हटवण्याच्या चर्चेमुळे गावात दोन गट आमने-सामने आले. याच मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाले. काही ठिकाणी धक्काबुक्कीच्या घटना घडल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणात सरपंच गणेश काकड यांच्यासह २३ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच चाळीसपेक्षा अधिक जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर कारवाई सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.

पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सामाजिक माध्यमांवर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही भडकाऊ माहिती प्रसारित केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. बाहेरील व्यक्तींनी गावात अनधिकृत जमाव करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!