जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२४
राज्यात गेल्या काही दिवसापासून बदलापूरच्या प्रकरण व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना घडल्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत असल्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांवर चांगलेच नाराज झालेत. त्यांनी या प्रकरणी वादग्रस्त विधान करणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची चांगलीच खरडपट्टी काढली. शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे राज्यात सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे केवळ कारवाईच्या घोषणा नको, थेट कृती करा, अशा शब्दांत शिंदे यांनी दीपक केसरकर यांना समज दिल्याचे आज पुढे आले आहे.
बदलापूर येथील एका शाळेत 2 चिमुकल्यांचे लैंगिक शोषण झाले होते. या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले होते. विरोधकांनी या प्रकरणी महाराष्ट्र बंदची घोषणाही केली होती. पण मुंबई हायकोर्टाच्या हस्तक्षेपामुळे हा बंद मागे घेण्यात आला होता. या घटनेवरून सरकारवर टीकेची झोड उठली असताना गत सोमवारी 26 ऑगस्ट रोजी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. यामुळे पुन्हा एकदा विरोधकांच्या हाती आयते कोलित सापडले. या दोन्ही घटनांमुळे महायुती सरकारपुढे विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.
विशेषतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारची राज्यभर चांगली प्रतिमा निर्मिती होत असताना या दोन्ही घटना घडल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतापलेत. त्यामुळे त्यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना चांगलेच खडेबोल सुनावले. शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे राज्यात सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे केवळ कारवाईच्या घोषणा करू नका, तर प्रत्यक्ष कृती करा. शाळांमध्ये मुलींच्या रक्षणासाठी कठोर उपाययोजना करा, असे एकनाथ शिंदे यावेळी केसरकर यांना उद्देशून म्हणाले.