ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांची घोषणा : ‘माझी लाडकी बहिण’योजनेत केला बदल

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरु असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘माझी लाडकी बहिण’ योजना सुरु केल्याची घोषणा केली होती. यात आता मुख्यमंत्री शिंदेंनी मोठा बदल केला आहे. ‘माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 2 महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे महिती दिली आहे.

योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात आली आहे. आता अर्ज करण्यासाठी 2 महिन्यांनी मुदतवाढ देण्यात आली आहे. लाभार्थी महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दर माह 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या ४ पैकी कोणतेही ओळखपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.

2.5 लाख रुपयांचा उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे. योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी 46 हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना सरकार दरमहा 1 हजार 500 रुपये देणार आहे. या योजनेचा लाभ विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिक्तत्या, निराधार सर्व स्तरातील महिलांना मिळणार आहे. 1 जुलैपासून या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत.

योजनेसाठी अर्ज पोर्टल, मोबाईल अॅप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल. पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते. पण, ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही, त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी, ग्रामीण, आदिवासी), ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असतील. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने स्वतः उर्ज भरण्याच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई केवायसी करता येईल. त्यासाठी महिलेने कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे शिधा पत्रिका (रेशन कार्ड) आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!