अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : नीती आयोग, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत अक्कलकोट तालुक्यात मागील दोन वर्षांत झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी नीती आयोगाचे प्रतिनिधी तुशाबा शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले हे त्यांच्यासोबत उपस्थित होते.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती स्तरावर सर्व विभागप्रमुखांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्याच्या चाळीस इंडिकेटरमध्ये अधिक प्रभावी प्रगती साधण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवता येतील, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आकांक्षीत तालुका कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी विभागप्रमुखांना विविध सूचना व मार्गदर्शन देण्यात आले.
बैठकीदरम्यान विविध विभागांकडून काम करताना येणाऱ्या अडचणी, अडथळे आणि अंमलबजावणीतील मर्यादा याबाबतही मोकळेपणाने चर्चा करण्यात आली. या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर कोणत्या सुधारणा करता येतील, यावर नीती आयोगाच्या प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर तुशाबा शिंदे यांनी जेऊर, कडबगाव व वसंतराव नाईक नगर या गावांना भेटी दिल्या. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी, पशुसंवर्धन दवाखाना तसेच बचत गटांच्या कामकाजाची पाहणी करण्यात आली. संबंधित कर्मचारी व ग्रामस्थांशी संवाद साधत कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी विविध सूचना व उपाययोजना सुचविण्यात आल्या.
ग्रामस्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी, मनुष्यबळाची कमतरता व सुविधांबाबतच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाय सुचवण्यात आले. स्थानिक सहभाग वाढवून विकासाची गती वाढवण्यावर विशेष भर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या दौऱ्यात गटविकास अधिकारी शंकर कवीतके, सहायक गटविकास अधिकारी अमोल मुंडे, प्रशांत अरबाळे, प्रकल्प अधिकारी विशाल भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, पाणीपुरवठा उपअभियंता व्ही. डी. राठोड, बांधकाम विभागाच्या उपअभियंता उषा बीडला, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे, जेऊरचे सरपंच काका पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.