मुंबई वृत्तसंस्था
महाराष्ट्रात अजूनही सत्ता स्थापन झालेली नाही. भाजप नेत्यांकडून येत्या 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडेल, असं जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार तयारीदेखील सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार हे आज दिल्लीच्या दिशेला रवाना झाले आहेत. ते दिल्लीत जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खातेवाटपाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दुसरीकडे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. पण त्यांना गृह खातं हवं आहे. याशिवाय एकनाथ शिंदे हे सध्या आजारी असल्यामुळे ते दिल्लीला चर्चेसाठी गेले नसल्याची माहिती आहे.
या सगळ्या घडामोडी सुरु असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. “राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर”, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडी आणि नितीन गडकरी यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. “नगरसेवकाला, आमदारकीची आशा, तर आमदाराला मंत्रिपदाची अपेक्षा, मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षश्रेष्ठी कधी बाजूला करतील, याची भीती”, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.