ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपकडून प्रतिसाद नाही, शिवसेना शिंदे गट अस्वस्थ; काय म्हणाले शिरसाट

छत्रपती संभाजीनगर वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत युती करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू असले तरी अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता वाढली असून, भाजपने प्रतिसाद दिला नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर्यायी मार्ग काढतील, असा इशारा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना भाजपच्या प्रस्तावाची वाट पाहत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस उरले असतानाही भाजपकडून कोणताही ठोस प्रस्ताव आलेला नाही. छत्रपती संभाजीनगरमधील भाजप नेतेही प्रतिसाद देत नसल्याची माहिती वरिष्ठ पातळीवर कळवण्यात आली आहे. शिवसेनेने भाजपला 41 जागांचा प्रस्ताव दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपसोबत आतापर्यंत 8 ते 9 बैठका झाल्या असून काही बैठकींमध्ये सकारात्मक चर्चा झाली, मात्र अंतिम निर्णय प्रलंबित असल्याचे शिरसाट म्हणाले. महायुती पुढे कशी न्यायची आणि त्यातून मार्ग कसा काढायचा, याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, युतीच्या मुद्द्यावर बोलताना संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार टीका केली. उबाठा गट 12 मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना त्यांनी उद्धव सेनेला लक्ष्य करत, “उबाठा गट आता केवळ मतांची बेरीज करण्याच्या तयारीत असून मुस्लिम मतांशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही,” असा आरोप केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!