ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उन्हाळाच नाही, हिवाळाही डिहायड्रेशनचा काळ!

डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता ही समस्या फक्त उन्हाळ्यातच होते, असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र आरोग्यतज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यातही शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते आणि ती वेळेत ओळखली नाही, तर आरोग्याच्या अनेक तक्रारी वाढू शकतात.

हिवाळ्यात डिहायड्रेशन का होते?

थंडीत घाम कमी येतो आणि तहानही फारशी लागत नाही. त्यामुळे अनेकजण पाणी कमी पितात. याशिवाय चहा, कॉफी यांसारख्या गरम पेयांचे प्रमाण वाढते. या सवयींमुळे शरीराला आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही आणि डिहायड्रेशनचा धोका वाढतो.

शरीरासाठी पाणी का आवश्यक आहे?

आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, चांगल्या आरोग्यासाठी रोज किमान २ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते, पचन सुधारते, सांधे लवचिक ठेवते आणि शरीरातील घातक घटक बाहेर टाकण्यास मदत करते. पाणी कमी पिल्यास त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होऊ शकतो.

हिवाळ्यात डिहायड्रेशनचे दुष्परिणाम

पचनक्रिया मंदावते, त्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होतो
किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो
शरीरातून विषारी घटक बाहेर पडत नाहीत
थकवा, कमजोरी, तोंड कोरडे पडणे, पोटात जळजळ जाणवते
विशेषतः किडनीचे आजार, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी पाण्याची कमतरता अधिक धोकादायक ठरू शकते.

हिवाळ्यातही शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास खालील लक्षणे दिसू शकतात

त्वचा कोरडी पडणे
ओठ फुटणे
लघवीचा रंग गडद होणे
सतत थकवा जाणवणे
चक्कर येणे

हिवाळ्यात स्वतःला हायड्रेट कसे ठेवावे?

दिवसातून थोड्या-थोड्या वेळाने कोमट पाणी प्या
आहारात सूप, फळे, भाज्या आणि नारळपाणी यांचा समावेश करा
चहा आणि कॉफीचे अति सेवन टाळा

थंडी असली तरी शरीराला पाण्याची गरज तितकीच असते. त्यामुळे हिवाळ्यातही पुरेसे पाणी पिण्याची सवय ठेवा आणि डिहायड्रेशनपासून स्वतःचे आरोग्य सुरक्षित ठेवा.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!