धाराशिव : वृत्तसंस्था
राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची धामधूम सुरु झाली आहे तर दुसरीकडे धाराशिव लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासह महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही नोटीस बजावली.
धाराशिव लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि महायुतीकडून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असतानाच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही उमेदवारांना आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत नोटीस बजावली आहे.
नोटीस पाठवण्याचे नेमकं कारण काय?
ओमराजे निंबाळकर यांनी एका सभेत बोलताना तेरणा हॉस्पिटलने रुग्णावर उपचार करण्यासाठी सरकारकडून 18 कोटी रुपये घेतले असा आरोप राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केला होता. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करताना घेतलेल्या प्रचार सभेत अर्चना पाटील यांनी 500-1000 रुपये देऊन गर्दी जमा केल्याची तक्रारही ओमराजे निंबाळकरांनी केली होती. हा आरोप चुकीचा असल्याचे सांगत अर्चना पाटील यांनी ओमराजेंची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती.
या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी नोटीस जारी केली आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारीच्या अनुषंगाने सबळ पुरावे तात्काळ सादर करण्याचे आदेश त्यांनी ओमराजे निंबाळकर यांना दिले आहेत.