मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत देत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य आघाडीबाबत मोठं विधान केलं आहे. येत्या एक-दोन दिवसांत या आघाडीची अधिकृत घोषणा होणार असल्याचं त्यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून आता फक्त “शेवटचा हात” मारायचा बाकी असल्याचं राऊत यांनी सांगितलं.
संजय राऊत म्हणाले, आमच्यात कोणताही विसंवाद नाही. हे आमचं दोघांचं घर आहे. मुंबईत शिवसेना आणि मनसे हे दोन प्रमुख मराठी पक्ष आहेत. काँग्रेसला त्यांचं स्वबळ दाखवायचं आहे, तर शरद पवार यांच्यासोबतही चर्चा सुरू असून दोन दिवसांत भेट होणार आहे. ही आघाडी सत्ताधाऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, हे दोघे याआधीही अनेक वेळा एकत्र आले आहेत, एकमेकांच्या घरी गेले आहेत आणि चर्चेला बसले आहेत. यापेक्षा वेगळं एकत्र येणं काय असतं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शक्तीप्रदर्शनाच्या चर्चेवर बोलताना राऊत म्हणाले, शक्तीप्रदर्शन होईलच, मात्र त्याची तशी गरज नाही. ज्या दिवशी पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल, त्या दिवशी मुंबईतील मराठी माणसाची गर्दी ओसंडून वाहील, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. शिवाजी पार्कमधील सभेवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना ते म्हणाले, शिंदे गटाला आता बुडबुडे आले आहेत. अमित शहांनी पक्ष तुमच्या ताब्यात दिला म्हणून तो तुमचा होत नाही. निवडणूक आयोगाच्या मदतीने जन्म झालेला हा पक्ष म्हणजे अमित शहांची टेस्ट ट्यूब बेबी आहे, अशी जहरी टीका त्यांनी केली.
शिंदे गट आणि भाजपच्या जागावाटपावर भाष्य करताना राऊत म्हणाले, ते अजूनही टप्प्याटप्प्याने खेळ करत आहेत. त्यांना त्या टप्प्यातच राहू द्या. मनसे आणि शिवसेनेची मागणी नैतिकदृष्ट्या योग्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज्याच्या राजकारणात लवकरच मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असल्याच्या चर्चांनाही संजय राऊत यांनी दुजोरा दिला असून, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांत मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.