नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदान चोरीवरून पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला घेराव घातला आहे. राहुल गांधींनी गायब मत लिहून एका बॉलिवूड चित्रपटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, आता चोरी चोरी-चुपके चुपके नाही काही गडबड करता येणार. कारण आता जनता जागी झाली आहे. तुमच्या मताची चोरी ही तुमच्या हक्कांची चोरी आहे. चला आपण सर्वांनी मत चोरीविरुद्ध आवाज उठवूया आणि आपले हक्क वाचवूया.
राहुल गांधी यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती पोलिस ठाण्यात म्हणत असल्याचे दिसत आहे की त्याचे मत चोरीला गेले आहे. तो अधिकाऱ्यांना सांगतो की लाखो मते चोरीला जात आहेत. यामुळे पोलिसांना प्रश्न पडतो की त्यांचे मतही चोरीला गेले आहे का. एक मिनिटांच्या व्हिडिओचे शीर्षक ‘मिसिंग व्होट’ आहे. ते अलीकडील चित्रपटाच्या शीर्षकावरून घेतले आहे.
या व्हिडिओमध्ये बनावट मते कशी टाकली जात आहेत, हे दाखवले गेले आहे. व्हिडिओमध्ये एक कुटुंब मतदान केंद्रात प्रवेश करताना दिसत आहे, ज्यामध्ये दोन व्यक्ती त्यांना सांगत आहेत की त्यांची मते आधीच टाकली गेली आहेत आणि शेवटी दोन्ही व्यक्ती बनावट मते टाकतात आणि टेबलावर बसलेल्या एका अधिकाऱ्याला अंगठा दाखवतात, ज्याच्या टेबलावर निवडणूक चोरी आयोगाची डिस्प्ले प्लेट आहे. कॉंग्रेसने दावा केला आहे की मत चोरी हा त्यांच्यासाठी करो या ममरोचा मुद्दा आहे आणि विविध उपक्रमांद्वारे त्यांचे आरोप लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक रोडमॅप जाहीर केला आहे. काँग्रेसने लोकांसाठी नोंदणी करण्यासाठी आणि मतदान चोरीविरुद्ध निवडणूक आयोगाकडून जबाबदारीची मागणी करण्यासाठी आणि डिजिटल मतदार यादीच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी एक वेब पोर्टल देखील सुरू केले आहे.