नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात नुकतेच काही राज्यात भाजपचे सरकार स्थापन होत आहे तर मध्यप्रदेश मध्ये देखील भाजपने पुन्हा बाजी मारल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण असेल यावर गेल्या काही महिन्यापासून चर्चा सुरु असतांना त्यावर अखेर पडदा पडला आहे. आता मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी शिवराज सरकारमधील उच्च शिक्षण मंत्री व दक्षिण उज्जैन मतदारसंघातून ३ वेळा आमदार झालेले डॉ. मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील. सोमवारी भोपाळमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ५८ वर्षीय ओबीसी चेहरा मोहन यादव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. चकित करणाऱ्या भाजपच्या या निर्णयासोबतच मध्य प्रदेशातील २० वर्षांचे शिवराज युग संपुष्टात आले. यादव हे मध्य प्रदेशचे २०वे मुख्यमंत्री होतील.
नव्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला व जगदीश देवरा असतील. नरेंद्र तोमर यांना विधानसभा अध्यक्ष केले जाईल. तथापि, याची अधिकृत घोषणा बाकी आहे. निवडीच्या काही वेळानंतर मोहन यादव राजभवनात दाखल झाले व सरकार स्थापनेचा दावा सादर केला. तत्पूर्वी शिवराजसिंह यांनी राजभवनात जाऊन राजीनामा सोपवला आणि तो तत्काळ मंजूरही करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी भाजपच्या भोपाळ प्रदेश कार्यालयात सोमवारी दुपारी ३ वाजता बैठक सुरू झाली. बैठकीला तिन्ही केंद्रीय निरीक्षक मनोहरलाल खट्टर (मुख्यमंत्री हरियाणा), डॉ. के. लक्ष्मण आणि आशा लकरा यांच्यासह राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री शिवप्रकाश उपस्थित होते. मध्य प्रदेशचे चार वेळचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विधिमंडळ पक्षनेते म्हणून मोहन यादव यांचे नाव प्रस्तावित केले. त्यावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. नवे मुख्यमंत्री तीन वेळा आमदार झाले आणि एकदा मंत्री होते. ५८ वर्षीय मोहन यादव यांनी पहिली निवडणूक २०१३ मध्ये दक्षिण उज्जैन मतदारसंघातून लढवली आणि २०२३ मध्ये लागोपाठ तिसऱ्यांदा विजयी झाले. त्यांनी ‘अभाविप’मधून राजकारणाला सुरुवात केली. तसेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही संबंधित आहेत.