ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अब की बार एक लाख पार..!

सोन्याच्या दरवाढीचा नवा विक्रम : डॉलरमुळेही दरवाढीला आधार

मुंबई : वृत्तसंस्था

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ (व्यापार युद्ध) मुळे अनिश्चिततेमुळे सोन्याची झळाळी कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारात सोन्याचे दार दररोज नवनवीन विक्रमी उच्चांकावर झेप घेत आहेत. गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावरील विश्वास कमी झाला असून सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात सोन्याकडे वळत आहेत. अशा स्थितीत, सोमवारी सकाळ होताच सोन्याचा भाव नवीन विक्रमी उच्चांकावर उसळी घेतली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या वायदा दरांनी एक लाखाच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली आणि सोमवारी बाजार उघडताच सोन्याने सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये प्रति 10 ग्रॅम 96,747 रुपयांचा नवीन उच्चांक गाठला. सोमवार दि. 21 एप्रिल रोजी सुरू असलेल्या व्यापार युद्धाच्या आर्थिक परिणामांबद्दलच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आणि कमकुवत डॉलरमुळेही दरवाढीला आधार मिळाला. अशा स्थितीत, सोमवारी बाजार उघडताच सोन्याचा वायदा भाव 1.36 टक्क्यांनी वाढून 96,552 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. शुक्रवारी गुड फ्रायडे असल्याने बाजार बंद होता तर, शनिवार आणि रविवारी बाजार बंद राहतो. अशा स्थितीत, तीन दिवसांनी बाजार उघडल्यावर सोन्याच्या दरांनी उंच उडी घेतली आहे.

भारतात सोन्याचा नवा उच्चांक
सराफा बाजारातही भारतात सोन्याचा दर सर्वकालीन उच्चांकी पातळीवर आहे. मात्र, सोमवार, 21 एप्रिल रोजी सोन्याच्या किमतीत थोडासा बदल झाला. गेल्या एका आठवड्यात सोने सुमारे 2,000 रुपयांनी महागले आणि 97 हजार रुपयांच्या पुढे गेले. कमकुवत डॉलरमुळेही सोन्याच्या दरवाढीला आधार मिळत आहे. डॉलर निर्देशांक तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सोन्याचे आकर्षण वाढत आहे. सोन्याची किंमत डॉलरमध्ये मोजली जाते त्यामुळे, अमेरिकन चलन कमकुवत झाल्यास इतर चलनांमध्ये सोने स्वस्त होते, ज्यामुळे मागणी वाढते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!