जगातील सर्वात लोकप्रिय ईमेल सेवा असलेल्या जीमेलच्या (Gmail) कोट्यवधी वापरकर्त्यांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक अपडेट समोर आले आहे. तब्बल दोन दशकांनंतर गूगल अशी सुविधा आणत आहे, ज्यामुळे वापरकर्ते आपला जुना किंवा नावडता @gmail.com ईमेल आयडी बदलू शकणार आहेत. विशेष म्हणजे, यासाठी नवीन अकाउंट तयार करण्याची गरज भासणार नाही आणि वर्षानुवर्षांचा महत्त्वाचा डेटा देखील सुरक्षित राहणार आहे.
गूगलच्या सपोर्ट पेजवरून या नव्या फीचरची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत एकदा तयार केलेला जीमेल आयडी कायमस्वरूपी असायचा. नवीन ईमेल हवा असल्यास युजर्सना नवीन अकाउंट तयार करून संपर्क, फोटो, ड्राइव्ह फाइल्स असा संपूर्ण डेटा मॅन्युअली ट्रान्सफर करावा लागत होता. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि त्रासदायक ठरत होती.
या नव्या अपडेटनुसार, ईमेल आयडी बदलल्यानंतर जुना आयडी डिलीट होणार नाही. तो ‘एलियास’ (Alias) म्हणून नव्या आयडीशी जोडलेला राहील. म्हणजेच, जुन्या पत्त्यावर आलेले सर्व ईमेल थेट नव्या इनबॉक्समध्येच मिळतील. वापरकर्ते जुना आणि नवा, दोन्ही आयडी वापरून लॉग-इनही करू शकणार आहेत.
गैरवापर टाळण्यासाठी गूगलने काही अटी ठेवल्या आहेत. एका वर्षात फक्त एकदाच ईमेल आयडी बदलण्याची परवानगी असेल. तर संपूर्ण आयुष्यात एका अकाउंटसाठी जास्तीत जास्त तीन वेळाच बदल करता येणार आहेत. म्हणजेच, एका जीमेल अकाउंटशी एकूण चार ईमेल आयडी (एक मूळ आणि तीन बदललेले) लिंक असतील.
महत्त्वाची बाब म्हणजे, या फीचरची माहिती सर्वप्रथम गूगलच्या हिंदी सपोर्ट पेजवर आढळली आहे. त्यामुळे या सुविधेचा सुरुवातीचा रोलआउट भारतातून होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंपनीने अधिकृत जागतिक घोषणा केलेली नसली तरी ‘हळूहळू रोलआउट’ सुरू असल्याचे संकेत दिले आहेत.
सोशल मीडियावर या अपडेटचे जोरदार स्वागत होत आहे. शाळा-कॉलेजच्या काळात तयार केलेले ‘फनी’ किंवा ‘कूल’ नावांचे ईमेल आयडी व्यावसायिक आयुष्यात अडचणीचे ठरत होते, अशी भावना अनेक युजर्स व्यक्त करत आहेत. या नव्या सुविधेमुळे कोट्यवधी लोक आपली डिजिटल ओळख अधिक व्यावसायिक पद्धतीने अपडेट करू शकणार आहेत.
ही सुविधा सध्या वैयक्तिक @gmail.com अकाउंट्ससाठी उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. ऑफिस, शाळा किंवा संस्थात्मक ईमेल आयडीसाठी संबंधित ॲडमिनिस्ट्रेटरची परवानगी आवश्यक असेल. सामान्य युजर्सना ‘My Account’ सेक्शनमधून हा बदल करता येणार आहे.