वाशीम : वृत्तसंस्था
देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे देशभरातील अनेकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे, नुकतेच वाशीम शहरातील पाटणी चौकात खाद्य तेलाच्या टँकरच्या कॉकचा पाइप फुटल्याने रस्त्यावर तेल वाहू लागल्याचा प्रकार घडला. रस्त्यावर पाण्यासारखे वाहणारे तेल पाहून नागरिकांनी तेल जमा करण्यासाठी एकच गर्दी केली. यामध्ये दुकान मालकाचे हजारो रूपयाचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम शहरातील दागडिया यांच्या दुकानासमोर खाद्यतेल तेलाचे टँकर मशीनद्वारे खाली केले जात होते. मात्र खाद्यतेल टँकर खाली करत असतांना अचानक टँकरमधील कॉकचा पाईप फुटला. ही बाब लक्षात येताच मशीन बंद करेपर्यंत पाईपमधून जवळपास 600 लिटर खाद्यतेल रस्त्यावर सांडले. खाद्यतेल रस्त्यावर सांडल्यामुळे पाण्यासारखे वाहत होते. वाहत असलेले तेल पाहताच उपस्थित असलेल्या पुरुष, महिला आणि लहान मुलांनी तेल जमा करून घरी नेण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.
या गर्दीमुळे काही वेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. ही बाब वाहतूक पोलिसांच्या लक्षात येताच त्या ठिकाणी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, या लिकेज झालेल्या पाईपमुळे दागडिया यांच्या खाद्य तेलाचे एकूण 60 हजार रूपयाचे नुकसान झाली असल्याची माहिती समोर आली आहे.