अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी; भाजपच्या सदस्यांनी घेतलं विधानसभा डोक्यावर
मुंबई : आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं. सभागृहात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सगळे आमदार आक्रमक झाले. भास्कर जाधव यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्व आमदारांनी केली.
यामुळे विधानसभेत चांगलाच गदारोळ पाहण्यास मिळाला. भास्कर जाधव यांनी दोनवेळा उठून उभं राहात मी कोणताही असंसदीय शब्द वापरलेला नाही त्यामुळे मी माझे शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतो असं सांगितलं. मात्र त्यांनी माफी मागितली नाही. देशाच्या सर्वोच्च नेत्याची नक्कल करणाऱ्या भास्कर जाधवांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. एवढंच नाही तर भास्कर जाधव माफी मागा या घोषणाही सभागृहात देण्यात आल्या.
भास्कर जाधव जे बोलले त्यावर मी हक्कभंगच आणणार आहे. पण माझं ऑबजेक्शन हे पंतप्रधानांची नक्कल केली यावर आहे. आम्ही इतर नेत्यांच्या नकला करायच्या का? असाही प्रश्न फडणवीस यांनी विचारला. आपणही हे सहन नाही केलं पाहिजे असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस जेव्हा सामनामध्ये आलेलं भाषण वाचत होते तेव्हा अध्यक्ष महोदयांनी आक्षेप घेतला होता. मुख्यमंत्र्यांबद्दल शब्द वापरलेले वाचून दाखवले तेव्हा अध्यक्ष महोदय म्हणाले होते की हा महाराष्ट्राचा अपमान होतो. मग पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल आणि अंगविक्षेप हा देशाचा अपमान नाही का? आम्हीही नकला करू शकतो पण आमच्यावर संस्कार आहेत. सभागृहात हे सगळं सहन करू नये आणि भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.