स्वतःच्या २१व्या वाढदिनाच्या निमित्ताने तब्बल २५० कि मि सायकल प्रवास करीत साहिलने युवकांना दिला एक आगळा वेगळा सामाजिक संदेश..!
दक्षिण सोलापुर : तालुक्यातील आचेगांव येथील असणाऱ्या आणि सोलापुर संगमेश्वर महाविद्यालयातील 9 महाराष्ट्र बटालियन NCC आणि कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकणारा मोहम्मद साहिल अमिनोद्दीन करनाचे या विद्यार्थ्याने आपल्या २१साव्या वाढदिनानीमित्त आचेगांव ते कर्नाटक राज्यातील गुलबर्गा पर्यंत आणि गुलबर्गा ते पुन्हा आचेगांव असा तब्बल २५० की.मि. चा प्रवास एका दिवसात पूर्ण करीत या प्रवासादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तिगृह, गुलबर्गा येथील बुद्ध विहार, जगतज्योती माहात्मा बसवेश्वर स्मृतीस्थल, ख्वाजा बन्दानवाज दरगाह, हसन बहामनी यांनी बांधलेला बहामनी किल्ला आणि ऐतिहासिक जामा मस्जिद, चोर गुंबद या व आशा गुलबर्गा शहरातील विविध ऐतिहासिक स्थळाना भेट देऊन आपण ज्या देशात राहतो तो भारत देश किती विविधतेने नटलेला असून दर १०० मैलावर आचार विचार आणि राहनिमान जरी बदलत असले तरी आपल्या देशाची संस्कृति मात्र बदलली नाही ती हजारो वर्षापासून आजवर जशीच्या तशी टिकून राहिली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील ज्या राष्ट्रपुरुषांनी आपल्या हयातीत जी राष्ट्र भावनेची ज्योत पेटविली ती त्यांच्या हयाती नंतर शेकडो वर्षा नंतर आजही निरंतर तेवत असून, तिचा प्रकाश आज ही माझ्या सारख्या युवकांच्या मनात राष्ट्र प्रेमाची जागृती करीत असल्याचा अद्भुद अनुभव या सायकल प्रवासा दरम्यान आल्याचे साहिल करनाचे याने बोलताना सांगितले.
इतक्या लांबचा सायकल प्रवास आणि तो ही वाढदिवसाच्या निमित्त त्यामुळे रस्त्याने चालताना कर्नाटक राज्यातील लोकांकड़ून मिळनारे प्रेम आणि आपलेपणा हा शब्दात न सांगण्या सारखे आहे. जगाला मानवता आणि शांततेचा संदेश देणाऱ्या आणि आत्मशांति आणि ईश्वर प्राप्तीसाठी सर्व सुखाचा त्याग करणाऱ्या गौतमबुद्ध यांचा वारसा आजही बुद्धविहारच्या माध्यमाने येथील लोकांनी जपला आहे. तर “कायकवे कैलास” म्हणजेच कर्म हेच स्वर्ग असा संदेश देऊन समाजातील रंजल्या गांजलेल्या वर्गाला समाजात समान न्यायाची संधि देणाऱ्या महात्मा बसवेश्वरांचा वारसा ही इथल्या लोकांनी जपला आहे. तर गुलबर्गा शहर आणि इतर ठिकाणाहुन येणाऱ्या भाविकांना आज ही प्रसिद्ध सूफ़ी संत हजरत ख्वाजा बंदानवाज यांची सर्वधर्म समभावाची शिकवण अहोरात्र मिळत आहे. हाच बोध या प्रवासातून मला आज माझ्या २१व्या वाढदिनी मिळाल्याचे हा २१ वर्षीय तरुण साहिल करनाचे आपल्या शब्दातुन व्यक्त होताना सांगतो.मनात सैन्यात भरती होण्याची जिद्द आणि त्यासाठी सर्वतोपरी कष्ट आणि मेहनत सोबत चिकाटीची शिदोरी घेऊन निघालेला हा २१ वर्षीय तरुण निश्चितच भविष्यात आपल्या आयुष्यात या भारत देशाचा सजग आणि प्रामाणिक नागरिक बनेल यात शंकाच नाही..