पंढरपूर : वृत्तसंस्था
गेल्या अनेक दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाचा विषयच जोरदार सुरु असतांना यंदा कार्तिकी एकादशीला राजकीय नेत्यांच्या हस्ते पूजा होणार नसल्याची जोरदार चर्चा सुरु होती मात्र आज अखेर कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना पुजेचा मान मिळाला आहे. घुगे हे गेल्या 15 वर्षांपासून न चुकता वारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे माझे मन भरुन पावले अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते करायची याची राज्यात चर्चा सुरु होती. मराठा समाजाने केलेल्या विरोधामुळे याविषयी साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, मोठ्या उत्साहात यंदाची कार्तिकी एकादशीची महापूजा केली गेली. प्रथेप्रमाणे कार्तिकी एकादशी निमित्त पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते महापूजा करण्यात आली. श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला, आणि त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली. राज्यातील बळीराजाला सुखी ठेव अशी मागणी आपण विठूरायाच्या चरणी केली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.