ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस : बच्चू कडू !

अमरावती : वृत्तसंस्था

काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारने 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले आहे. अशातच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी बाबत वादग्रस्त विधान केले आहे. सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचे, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं विखे पाटील म्हणाले होते.

त्यांच्या या विधानावर आता प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. “जो कोणी राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल, त्याला मी एक लाख रुपयांचं रोख बक्षीस देईन,” अशी धक्कादायक घोषणा बच्चू कडू यांनी अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. एवढंच नाही तर “मला विखे पाटलांची गाडी कुठे दिसली तर मी स्वतः हातात दगड घेऊन फोडीन,” असा उघड इशारा त्यांनी दिला आहे.

कडू म्हणाले, “राधाकृष्ण नाव आहे, पण कृत्य मात्र कंसाचं आहे. हा कंसाचा अवतार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतोय,” अशा कठोर शब्दांत बच्चू कडूंनी विखे पाटलांवर निशाणा साधला. पुढे बोलताना ते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कंसाच्या अवलादीला तात्काळ मंत्रिमंडळातून हाकलून लावावं. शुक्र माना की लोक तुम्हाला मारत नाहीत, ही नालायकी आता थांबवा” असंही कडू म्हणाले.

काय म्हणाले होते राधाकृष्ण विखे पाटील?

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंढरपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना शेतकरी कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचे, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं विखे पाटील म्हणाले. चूक लक्षात येताच त्यांनी ‘आपल्या महायुती सरकारने कर्जमाफी जाहीरच केली आहे, आपण शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करणार आहोत’ असं म्हटलं होत.

बच्चू कडूच्या विखे पाटलांवरील वक्तव्यानंतर भाजप आमदार प्रवीण तायडे आक्रमक झाले आहेत. चिथावणीखोर वक्तव्य करून बच्चू कडू कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. जेवढं वय बच्चू कडूंच आहे तेवढा अनुभव राधाकृष्ण विखे पाटलांचा आहे, असं म्हणत प्रवीण तायडेंनी बच्चू कडूवर निशाणा साधला. तसेच चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी बच्चू कडू वर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी आमदार प्रवीण तायडे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!