ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विरोधक सीएएबाबत अफवा पसरवताय ; पंतप्रधान मोदी

कुचबिहार : वृत्तसंस्था

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (सीएए) विरोधक अफवा पसरवत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्याच वेळी भारताबाबत जिव्हाळा असलेल्या लोकांना नागरिकत्व देणे ही मोदीची गॅरंटी असल्याचेही ते म्हणाले.

पंतप्रधानांनी गुरुवारी पश्चिम बंगालच्या कुचबिहार आणि बिहारच्या जमूई येथे प्रचारसभा घेतल्या. या वेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर एकमेकांवर आरोप करत तुरुंगात पाठवण्याची मागणी करणारे लोक आज माझ्याविरोधात एकजूट झाले आहेत. भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी हे इंडिया आघाडीच्या नावाखाली एकत्र आले आहेत. या आघाडीतील नेत्यांनी शेजारील देशांमधील पीडित अल्पसंख्याकांचा कधीही विचार केला नाही. आम्ही सीएए कायदा आणून या शरणार्थ्यांना सन्मानाने जगण्याची संधी देत आहोत; परंतु विरोधक सीएए विरोधात अपप्रचार करून देशातील अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण करत आहेत.

परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की, भारताबद्दल जिव्हाळा असलेल्या लोकांना नागरिकत्व देणे मोदीची गॅरंटी आहे, असे मोदी म्हणाले. संदेशखाली प्रकरणावरून बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर टीका करताना मोदींनी पीडित महिलांचे गुन्हेगार आयुष्यभर तुरुंगात राहतील, असे आश्वासन दिले. बिहारमधील सभेत मोदींनी काँग्रेस व राजदला लक्ष्य केले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात भारत हा कमकुवत व गरीब देश होता, असा दावाही त्यांनी केला.

आज भुकेकंगाल झालेला देश आपल्यावर दहशतवादी हल्ले करायचा आणि काँग्रेस नेतृत्व इतर देशांकडे तक्रार करत होते. मात्र आजचा भारत घरात घुसून मारतो. आजचा भारत जगाला दिशा दाखवतो. गत दहा वर्षात जगात भारताची प्रतिष्ठा वाढली. भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार देखील सभेला उपस्थित होते. नितीश यांनी राज्यातील सर्व ४० जागांवर एनडीएचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच आता आपण एनडीएमधून कुठेच जाणार नसल्याचेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!