ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विधानसभा अध्यक्षांची निवड होणार “ह्या” पद्धतीने, यावर विरोधी पक्षाने घेतला आक्षेप

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानानं होणार आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल सभागृहात मांडण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी हा अहवाल सभागृहात मांडला. यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर आपल्याकडे आपण म्हणताय की बहुमताचा आकडा मोठा आहे तर एवढी भिती का आहे. केवळ एक दिवसाचा कालावधी का देण्यात आला. कालावधी कमी करण्याचा नियम आपल्याला बदलता येणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी म्हटलं की, जर रेटून नेणार असाल तर आम्ही कायदेशीर लढाई करणार आहोत, आपल्या आमदारांवर एवढा अविश्वास का आहे, असेही फडणवीस म्हणाले.

यावर आमदार नाना पटोले म्हणाले की, घोडेबाजार बंद व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे. आपण पहिल्यांदा आपण नियम बदलत आहोत का? या नियम बदलाला आमचा पाठिंबा आहे, असं पटोले म्हणाले.

यावर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपली बाजून मांडताना बेईमानी हा शब्द वापरला. त्यावर सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. यावर मुनगंटीवार म्हणाले की, बेइमानी हा शब्द का मागे घ्यायचा. त्यांनी घोडेबाजार हा शब्द वापरला. सर्व सदस्यांचा त्यांनी अवमान केला. हा काय घोड्यांचा तबेला आहे का? नानाभाऊ दहा वर्षे भाजपमध्ये राहिलात एवढे संस्कार केले ते तर दाखवा, असं मुनगंटीवार म्हणाले.

विधिमंडळाचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळालेत. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खडाजंगी झाली. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केवळ शोकप्रस्ताव होतो. मी आग्रह केला शोकप्रस्तावाबरोबर केवळ प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी ठेवा. पण आज सरकार १२ विधेयके मांडणार आहे, ते करू नये, असे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आज कामकाज पत्रिकेत जे कामकाज आहे ते घ्यावे. विधेयके घेऊ नयेत ही बाब आम्हाला मान्य आहे, असे सांगत कामकाजात विरोधकांचा होणार अडथळा पार केला. विधेयके घेऊ नयेत ही बाब आम्हाला मान्य आहे, असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हणत विरोधी पक्षनेत्यांची सूचना स्विकारली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!