मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील पुढील तीन ते चार दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाण्यासह मराठवाडा आणि उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागातही पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूरसह अन्य जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबारसह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात आज अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पावसाच्या पार्श्भूमीवर नागरिकानी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.