नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. दिल्लीत कालही सकारात्मक चर्चा झाली. ज्या अडचणीच्या जागा होत्या त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त आम्ही सोडवल्या आहेत. उरलेल्या जागा दोन दिवसात क्लिअर करू, आमची यादी कुठल्याही क्षणी येऊ शकते असे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुर विमानतळावर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
दिल्ली दरबारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत महायुतीच्या बैठका पार पडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित होते. शनिवारी (दि.19) नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात प्रदीर्घ बैठक पार पडली. यावेळी विदर्भ विशेषत नागपूर जिल्ह्यातील 12 जागावरील उमेदवारांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासोबतच थेट निवडणूक प्रक्रियेत नसले तरी गडकरी हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत.
विदर्भात नव्हे तर राज्यात प्रचारात त्यांच्या मदतीची गरज आहे हे लक्षात घेता या नियोजनावर,प्रमुख मुद्द्यांवरही चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, फडणवीस म्हणाले, आमचे असे ठरले आहे की, महायुतीत क्लिअर झालेल्या जागा त्या- त्या पक्षाने आपल्या सोयीने जाहीर कराव्यात. यामुळं आमची,भाजपची पहिली यादी कधीही येऊ शकते. लवकरच येऊ शकते अशी परिस्थिती आहे. यासोबतच महायुतीचे जागांचे ब्रेकअप देखील आम्ही लवकरच सांगू असे सांगितले.