पुणे वृत्तसंस्था : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची जोरदार प्रचारसभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भाषण करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीतील आरोप-प्रत्यारोप अधिकच तीव्र झाले असून, आमदार महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक युद्धाला मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यामुळे नवे वळण मिळाले आहे.
सभेत सर्वप्रथम बोलताना आमदार महेश लांडगे यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) मुद्द्यावर जोरदार टीका केली. *“काही लोक एसआरएच्या नावाखाली नागरिकांना धमकावत आहेत, जणू काही ही त्यांची स्वतःची जागा आहे. इथला एक नेता स्वतःला एसआरएचा बाप समजतो. अशा लोकांना जागा दाखवावी लागेल. एसआरएमध्ये घुसलेल्यांना खूप माज आलाय. देवा भाऊ, त्यांचा बंदोबस्त करावा लागेल,”* असे म्हणत लांडगे यांनी थेट टीकेचा सूर लावला.
यानंतर अजित पवारांवर अप्रत्यक्ष आरोप करत लांडगे म्हणाले, “ज्यांनी आमच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप केले, त्यांना दोन दिवसांत उत्तर दिलं आहे. युतीत फक्त भाजपनेच इतरांचा सन्मान करायचा का? खोटं नरेटिव्ह पसरवून भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझी तेवढी उंची नाही, तेवढी कुवत नाही असं सांगून माझ्यावर शिंतोडे उडवले जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
महेश लांडगेंच्या या आक्रमक भाषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना स्पष्ट संदेश दिला. “निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो. आरोप सुरू होतात. पण परिंदे में मिलेगी मंजिल एक दिन… पंख ज्यांचे पसरलेले आहेत, त्यांनाच मंजिल मिळते,” अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “आपलं काम बोलतंय, त्यामुळे हा वैताग आहे, त्रागा आहे. जरा समजून घ्या दादा, ते रागावले म्हणून तुम्ही रागावू नका. त्यांच्याकडे सांगायला काम नाही, प्रश्नांची उत्तरं नाहीत. म्हणून ही निवडणूक आरोप-प्रत्यारोपात गुंतवायची आहे. पण आपण विकासाच्या मुद्यावरच बोलत राहिलो पाहिजे,” असे म्हणत फडणवीस यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे सुनावले.
या सभेमुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील राजकीय वातावरण अधिक तापले असून, पुढील काळात भाजप-राष्ट्रवादीमधील वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.