ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दिल्लीत उमटले पडसाद : मुख्यमंत्री फडणवीसांचा पुतळा जाळत राजीनाम्याची मागणी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राज्यातील सातारा जिल्ह्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठांच्या दबावामुळे आत्महत्या केली होती. तसेच त्यांच्यावर एका पोलिस अधिकाऱ्याने 4 वेळा बलात्कार केल्याचे देखील सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले होते. या घटनेनंतर महाराष्ट्रात संतांपाच लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ कॉंग्रेस देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

दिल्ली येथे युवा कॉंग्रेस कडून फलटण प्रकरणाच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मृत डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा देखील जाळण्यात आला. यावेळी कार्यकर्ते पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्स वर देखील चढल्याचे पाहायला मिळाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

फलटण येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ट्विट करत निषेध नोंदवला होता. साताऱ्यातील घटना कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. इतरांचे दु:ख कमी करण्याची आकांक्षा बाळगणारी एक होतकरु डॉक्टर भ्रष्ट व्यवस्थेतील गुन्हेगारांच्या छळाचा बळी ठरली. गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली, त्यांनीच हा सर्वात घृणास्पद गुन्हा केला, असे ते म्हणाले.

वृत्तांनुसार, भाजपशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनी तिच्यावर भ्रष्टाचार करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्नही केला. संरक्षित गुन्हेगारी विचारसरणीचे हे सर्वात घृणास्पद उदाहरण आहे. ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे. जेव्हा सत्ता गुन्हेगारांना संरक्षण देते, तेव्हा न्यायाची अपेक्षा कोण करू शकते? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. डॉक्टरच्या मृत्यूने भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस आणला आहे. न्यायाच्या या लढाईत आम्ही पीडितेच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत. भारताच्या प्रत्येक मुलीसाठी आता भीती नाही, आम्हाला न्याय हवा आहे, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!