संतापजनक : मृत आईसह दोन चिमुकल्यांना प्रियकराने नदीत फेकले
आईचा मृतदेह पाहून रडणाऱ्या मुलांना फेकले नदीत
पुणे : वृत्तसंस्था
अनैतिक संबंधातून गरोदर राहिलेल्या विवाहित प्रेयसीचा गर्भपात करताना मृत्यू झाला. डोळ्यासमोर आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना पाच आणि दोन वर्षांचे पोटचे गोळे जिवाच्या आकांताने रडू लागले. आणि बिंग फुटण्याच्या भीतीपोटी त्या नराधमाने चिमुकल्यांना जिवंतपणी इंद्रायणी नदीत फेकून दिले. सोमवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून तिहेरी हत्याकांडाने तळेगाव हादरून गेले. समरीन निसार नेवरकर (२५, रा. समता कॉलनी, वराळे) असे मृत महिलेचे नाव असून ईशांत निसार नेवरेकर (५)इजान निसार नेवरेकर (२) अशी फेकून दिलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आरोपी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (३७, रा. समता कॉलनी, वराळे) आणि रविकांत भानुदास गायकवाड (४१, रा. सावेडी, अहमदनगर) यांना अटक केली आहे. गर्भपात करण्यासाठी एजंट महिला व कळंबोली येथील अमर हॉस्पिटलमधील संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाम कादर महदहनिफ (५२, रा. वराळे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रेयसी समरीन व आरोपी गजेंद्र एकाच परिसरात राहत असून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. दरम्यान, अनैतिक संबंधातून गर्भवती राहिल्याने ६ जुलै रोजी गर्भवती प्रेयसीला आणि तिच्या ५ आणि २ वर्षीय मुलांना घेऊन प्रियकर गजेंद्र हा कळंबोली (ठाणे) येथे गर्भपात करण्यासाठी गेला. तेथील अमर रुग्णालयात प्रेयसीचा गर्भपात करताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे – प्रेयसीचा ८ जुलैला मृत्यू झाला. गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गायकवाडच्या सोबतीने मावळमध्ये आणला. मग गजेंद्र आणि रविकांतने ९ जुलैच्या अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला. डोळ्यादेखत आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत असल्याचे पाहून दोन्ही मुले मोठ्याने रडू लागली. या दोघांमुळे आपले बिंग – फुटेल, या भीतीने आरोपींनी निर्दयीपणाचा कळस गाठत दोन्ही चिमुकल्यांना त्याच नदीच्या प्रवाहात – जिवंत फेकून दिले. दरम्यान, घटना उघडकीस आल्यानंतर तिघांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. समरीनचे मूळ गाव अक्कलकोट आहे. गर्भपात करण्यासाठी समरीन ही ५ जुलै रोजी दोन्ही मुलांसमवेत घराबाहेर पडली. याबाबत आई-वडिलांना तिने आपण अक्कलकोट येथे बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी जात असल्याचे खोटे कारण सांगितले. अक्कलकोटला पोहोचल्यानंतर मी कॉल करते, असेही ती म्हणाली. त्यानंतर ती रविकांत याच्यासोबत कळंबोली येथे गेली. मात्र, दिवसभरात तिने कुटुंबीयांशी कोणताही संपर्क साधला नाही. घरच्यांनी कॉल केला असता तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ६ जुलै रोजी आईने तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. याप्रकरणी आरोपींना ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
घटनेनंतर आरोपी हे काही घडलेच नाही, असे वावरू लागले. दरम्यानच्या काळात प्रेयसीसोबत तिच्या कुटुंबीयांचा संपर्क होत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत तिघे हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. प्रेयसीला गजेंद्रने अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचे आणि गजेंद्रने मित्र रविकांतशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचे तपासात समोर आले. या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली. मात्र दोघेही उडवाउडवीची उत्तरे देत होते. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी खुनाची कबुली दिली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.