ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंकजा मुंडेंना मिळणार मोठी संधी ; दिल्लीत हालचाली सुरु

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील बीड लोकसभा निवडणुकित मोठ्या चर्चेची ठरली आहे. यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभवाचा मोठा धक्का देणारा ठरलं असून आता पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. भाजपच्या गोटात त्यादृष्टीने हालचाली सुरु असल्याचे कळते. दिल्लीत नुकतीच भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडून आल्याने त्यांच्या राज्यसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसे घडल्यास पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे कमालीचे निराश आणि नाउमेद झालेल्या त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या, असा एक मतप्रवाह भाजपच्या राज्यातील नेत्यांमध्ये आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राज्यसभेवर घेण्याची केंद्रीय नेतृत्वाला केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे या बीड मतदारसंघातून रिंगणात उतरल्या होत्या. त्या विजयाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. मात्र, शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढाईत पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. पंकजा यांचा हा पराभव बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकांसाठी मोठा धक्का ठरला होता. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचे राज्यसभेवर पुनर्वसन झाल्यास मुंडे समर्थकांना काहीप्रमाणात दिलासा मिळू शकतो. मात्र, यापूर्वीही महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा व्हायची. उमेदवारीच्या शर्यतीत त्याच आघाडीवर आहेत, असे सांगितले जायचे. परंतु, प्रत्येकवेळी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांची निराशा झाली होती. त्यामुळे आता या खेपेला तरी हे दुष्टचक्र भेदले जाणार का, हे पाहावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!