सोलापूर : प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपले उमेदवार घोषित करीत असतांना भाजपने माढा लाेकसभाेसाठी आठ वेळा सर्व्हे केला. निवडून येण्याच्या क्षमतेचा निकष लावून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना उमेदवारी दिली. तरीही शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटातून निंबाळकर विरोधाचा सूर उमटला आहे. दरम्यान, साेलापूरसाठी सुमारे २० जण स्पर्धेत आहेत. त्यातून नवीन चेहरा आणला जाईल अशी शक्यता आहे.
शिंदेसेनेचे माढ्यातील नेते संजय काेकाटेंनी भाजपचा प्रचार करायचा नाही असे म्हणत राजीनामा दिला. फलटणचे संजीवराजे निंबाळकर, अकलूजचे धैर्यशील माेहिते-पाटील यांनी विरोधात भूमिका घेतली आहे.
‘कमळ हे चिन्ह आणि माेदी हा चेहरा’ हाच साेलापूरचा उमेदवार समजून आम्ही कामाला लागलो आहाेत, असे आ. सुभाष देशमुख म्हणाले. आमदार राम सातपुतंेना साेलापूरची उमेदवारी द्यावी. माळशिरस विधानसभेला माेहिते-पाटील सांगतील ताे उमेदवार जाहीर करावा, असा फाॅर्म्युला वापरण्याचा प्रयत्न असल्याचेही म्हटले जात आहे. कारण सातपुतेंना फडणवीसांचे विश्वासू म्हणून माळशिरसमधून उमेदवारी मिळाली हाेती. आता साेलापुरात स्थानिक उमेदवार द्यावा, हा दबाव आहे.