ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पवार साहेबांच्या मनात जे असते तेच करतात ; अजित पवार

पुणे : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील हे शरद पवारांचे विधान केवळ संभ्रम पसरवण्यासाठी करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष काँग्रेसमध्ये कधीच विलीन करणार नाहीत. मागील अडीच वर्षांत मी उद्धव ठाकरेंचा स्वभाव फार जवळून अनुभवला आहे. पवारसाहेब कुठलाही निर्णय हा सामूहिकरीत्या घेतल्याचे सांगतात. चर्चा केल्याचे भासवतात. परंतु त्यांच्या मनात जे असते तेच ते करतात, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांवर केली.

शिरूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, भाजपसोबत जाण्याची चर्चा झाली होती, हे किमान शरद पवार आता मान्य करायला लागलेत. दिल्लीत वरिष्ठांसोबत पाच ते सहा बैठका झाल्या. या बैठकीत भाजपसोबत जाण्याचे ठरले होते. पुन्हा मुंबईला आल्यावर निर्णय बदलला. पुन्हा शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात आता त्यांचा पक्ष आणि चिन्ह वेगळे आहे. कुठे जायचे हा त्यांच्या अखत्यारितील विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका सभेत काँग्रेसवर अदानी-अंबानींकडून ट्रक भरून पैसे घेतल्याच्या आरोपावर, इतक्या मोठ्या पातळीवरील प्रश्न मला विचारू नका, महाराष्ट्रात काय चाललंय याबद्दल मी बोलेन, असे सांगून अजितदादांनी भाष्य करण्याचे टाळले. अमोल कोल्हे यांनी आढळरावांवर केलेल्या आरोपावर पवार म्हणाले, शिवाजीराव आढळराव तीन टर्म खासदार होते. त्यांची १५ वर्षे आणि कोल्हेंची ५ वर्षे याची तुलना शिरूरच्या जनतेने करावी. आढळराव गेल्या वेळी कमी मतांनी पराभूत झाले. पराभूत झाले तरी त्यांनी जनसंपर्क कायम ठेवला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!